Man Shahare Kahure (Breathless)

Prajakta Gavhane

मन शहारे काहुरे दूर देशी मी चालले
वाटे सोडू नये गाव आसू डोळयांस या सांगे
गूढ पायवाट राही मागे मागे मागे मागे
धागे पाणंदीचे मनी गाव आठवांचा जागे
सय मनात मावेना धग उरात सोसेना
सोस सोसण्याचा भारी त्याला वेसच दिसेना
वेळू लपेटून वाहे माझ्या गावची ही नदी
जणु चाकातून बुक्का उडे गावची ही माती
माती भुरळ घालते नाही विरळ हे नाते
नाते विरहातसुध्दा गीत मातीचे या गाते
गावी कौलारू घरांना शोभे आंब्याचे तोरण
उंच पिंपर्णीची झाडे साद घालती बेचैन
गेरू रंगवावा तसा रंग रंगतोया जीव
शीव ओलांडता खूपे जसा निवडुंगाचा पेव
मन इथेच दंगते मन इथेच सांडते
ओवी ओवीत गंफुनी मन भजनी रंगते
मन वाऱ्यावर वाहे
वारा चाफ्याशी या बोले
चाफा रामाच्या पुढयात
माझी भातुकली मांडे
बालपण वेचले मी रामाच्या या पोळीवर
डाव खेळताना मोडे नेमकाच घडीवर
घडी घडीला आठवे आज रामाचे देऊळ
जाते देवळाची वाट माझ्या वाडयाच्या जवळ
माझा वाडा चिरेबंदी
भव्य दार हुरमंजी
मन चौकातच मध्ये
घुटमळे वृंदावनी
घुमे अडणा दाराचा वाडाभर करकर
त्याचा रूबाबच सांगे कुणा नाही त्याची सर
मुख्य वाडयाच्या गस्तीला ठाके चौघडा-सोपा
सांज पहाटेला दुमदुमे सनई चौघडा
सदर उजव्या अंगाला पुढे सोनाराचा सोपा
सदा आपुलकी रांधे माझ्या चुलीचा हा खोपा
माझ्या वाडयातच गोठा आणि तबेलाही तिथं
उभा मर्जीतला घोडा गाई नांदतात इथं
अश्शा वाडयात या माझ्या
साऱ्या आठवणी ताज्या
राम पालखीला येई
त्याचा किती गाजावाजा
देवघरी ही समई सांज तेलवात तेवे
गुण्या गोविंदाने गाई इथे नाही हेवे-दावे
ऐकू येई घंटानाद संगे मायेची ती हाक
ये गं परतूनी पोरी सांगे निरोपाचा हात
सुने रान माझ्याविना सुने शिवार फुलेना
सुनी तट्टयाची ती गाडी सुने मोटेचे ते पाणी
कानी नाही झुळझुळ नाही घुंगुराची माळ
जोडी खिल्लारी राहिना नाही ऊसाचं गुऱ्हाळ
गेली भलरी विरून नाही कापणीची मजा
गेले गोफण नि विळा गेली चावडीची सजा
कोण पुसे पावलीला आधल्याला आठव्याला
कोण पुसे माणसाला पिंपळाच्या मुंजाबाला
आज पडका झडका गाव परका परका वाटे
वाटेतले तळे एकाएकी पार आटे
धूमी धुमसते आत तिला उंडयाचीच आस
पाणी शेंदताना जस्सा लाडे विहीरीचा जाच
काच सुटला कधीचा जीव मातीतच मळे
सूरपारंब्या मारूनी जीव हुतुतूही खेळे
जीव पारिजात होई जीव निर्माल्यात सुके
जीव टाळात कुटूनी पायी विठूच्या या झुके
जीव चोपाळयात झुले जीव गवळणीत डोले
जीव पहाटेच्या पिंगळाच्या कंदिलाला भुले
जणु त्याने दाखविली मला उजेडाची वाट
वाट चालायाला हवी कशी फिरवू मी पाठ
पाठ गावचा हा पाढा आणि गावचाच ओढा
ओढी मागे मागे जीव पडे मायेचाच वेढा
डोळे भरूनीया येती गळा दाटूनी गं येतो
मातीच्या या विरहाने जीव कस्सानुसा होतो
दूरदूरच्या देशांना दाही-दाहीच्या दिशांना
मला जायलाच हवे मला जिंकायाला हवे
लेक परक्याचे धन मला खोडायाला हवे
माती देईलच बळ माती दावील आभाळ
घरी परतूनी येता माती करील जवळ
माती देईलच बळ माती दावील आभाळ
घरी परतूनी येता माती करील जवळ
माती देईलच बळ माती दावील आभाळ
घरी परतूनी येता माती करील जवळ

Most popular songs of बेला शेंडे

Other artists of Film score