Uthi Shrirama
उठी श्रीरामा
उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली
कौसल्या माऊली
उठी श्रीरामा
होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतून कालवडींचे दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली
कौसल्या माऊली
उठी श्रीरामा
काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याचा दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा
वशिष्ठ मुनीवर घेऊन गेले पूजापात्र राऊळी
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली
कौसल्या माऊली
उठी श्रीरामा
राजमंदिरी दासी आल्या रत्नदीप विझविण्या
ऊठ राजसा पूर्व दिशेचा स्वर्ण-यज्ञ पाहण्या
चराचराला जिंकून घेण्या अरुणप्रभा उजळली
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली
कौसल्या माऊली
उठी श्रीरामा